जॉर्जिया- अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडीसाठी 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीतील पराभवाचा निकाल उलथवून लावल्याचा प्रयत्न केल्याबद्दल जॉर्जियाच्या ग्रॅन्ड ज्युरींनी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर संगनमत केल्याचा आणि अन्य 12 गुन्ह्यांचे आरोप ठेवले आहेत.
ट्रम्प यांच्या समवेत त्यांचे ऍटर्नी रुडोल्फ गिलियानी आणि व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मॅडोवस यांच्यासह एकूण 18 जणांवर संगनमत केल्याचा आणि अन्य गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला आहे. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गेल्या पाच महिन्यात हे चौथे आरोपपत्र ठेवण्यात आले आहे. अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल उलथवून लावण्याबद्दलचे हे दुसरे आरोपपत्र आहे.
जॉर्जियातील डिस्ट्रीक्ट ऍटर्नी फनी विलीस यांनी फेब्रुवारी 2021 मध्येच या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. ट्रम्प यांनी जॉर्जियाचे परराष्ट्र मंत्री ब्रॅड रॅफेनस्पेर्जर यांना फोन करून बायडेन यांचा विजय उलथवून टाकला जाऊ शकेल एवढी मते मिळवण्यास सांगितले होते. जॉर्जियाच्या कायद्यानुसार हा निवडणुकीतील हेराफेरीचा गुन्हा ठरत असल्यामुळे याची गंभीर दखल घेण्यात आली आहे, असे ऍटर्नी डिस्ट्रीक्ट फनी विलीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आगामी 6 महिन्यात ट्रम्प यांच्यावरील खटला सुरू करण्यात येईल, असेही फनी विलीस यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. हे आरोप राजकीय दृष्टिकोनातून प्रेरित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे आरोपपत्र तीन वर्षांपूर्वीच सादर केले जाऊ शकले असते. मात्र मात्र अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हे प्रकरण उकरून काढण्यात आले आहे. फुल्टन काउंटी डिस्ट्रिक्ट ऍटर्नी विलिस यांनी 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीत धाड टाकणाऱ्या लोकांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, जे घडले त्याबद्दल उत्तर मागणाऱ्यांवर नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.