पुणे – कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खून प्रकरणातील १५ आरोपींवर दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी न्यायालायने पुणे पोलिसांना ३० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. पुणे पोलिसांच्या वतीने दोषारोप पत्र दाखल ९० दिवसांची वाढ मिळावी यासाठी अर्ज करण्यात आला होता.
कोथरूडमधील सुतारदरा परिसरात गोळ्या घालून दि. ५ जानेवारीला शरद मोहोळचा खून करण्यात आला होता. याप्रकरणात १६ जणांना अटक करण्यात आली, त्यांच्यावर मोक्का कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार गणेश मारणे यासह इतर १५ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
यातील गणेश मारणे वगळता इतरांविरोधात दोषारोप पत्र दाखलसाठी मुदतवाढ मिळावी, यासाठी पुणे पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने ३० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. तसेच, उर्वरित ६० दिवसांची मुदतवाढ मिळावी यासाठी पुणे पोलिसांच्या वतीने मोक्का विशेष न्यायालायत अर्ज करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे करीत आहेत.
मुदतवाढ का ?
मोक्का, एनडीपीएससारख्या गुन्ह्यात आरोपीला ३० दिवसांची पोलीस कोठडी घेता येते. इतर गुन्ह्यात फक्त १४ दिवसांचीच पोलीस कोठडी घेता येते. तसेच इतर गुन्ह्यात दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांचा वेळ असतो. मोक्का कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल असेल तर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी १८० दिवसांची मुदत मिळते. मात्र ९० दिवसानंतर दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी वाढीव मुदत मिळावण्यासाठी न्यायालयात अर्ज करणे गरजेचे असते