वडूज (प्रतिनिधी) – खटाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी होणार असल्याने वडूजमधील वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत उद्या, दि. 18 रोजी बदल करण्यात आले आहेत.
आयलॅंड चौक ते हॉटेल मेजवानी परिसरातील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. मतमोजणी केंद्रापासून 500 मीटर अंतरावरील हॉटेल्स व दुकाने बंद राहतील.
साताऱ्याकडून येणाऱ्या वाहनांची पार्किंग सोय अक्षता मंगल कार्यालय परिसर, पेडगाव रोडकडील एसटी डेपोच्या बाजूला मैदानावर करण्यात आली आहे. कराडकडून येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची सोय ज्योतिबा मंदिर व समोरील वनिकरणात करण्यात आली आहे.
पुढे जाणाऱ्या वाहनांसाठी एसटी डेपो मैदान, काटकर हॉस्पिटल समोर, दहिवडीकडून येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची सोय काटकर हॉस्पिटलसमोर एटी डेपोच्या मोकळ्या मैदानात करण्यात आली आहे. मतमोजणी ठिकाणापासून प्रतिबंधित परिसरात गुलालाची उधळण करण्यास व जमाव जमवण्यास बंदी आहे.