पुणे – मतदारांना मतदान करणे अधिक सोयीचे व्हावे, यासाठी अधिकाधिक मतदान केंद्र ही तळमजल्यावर स्थापन करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघातील 1 हजार 187 मतदान केंद्रांच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
जिल्ह्यात एकूण 7 हजार 915 मतदान केंद्र आहे. यामध्ये मूळ मतदान केंद्र 7 हजार 666 इतकी आहे. तर सहायक मतदान केंद्र 249 मतदान केंद्र आहेत. यातील 1 हजार 187 मतदान केंद्रांमध्ये बदल केला आहे. काही मतदान केंद्रांसाठी तात्पुरते शेड उभारण्यात आली आहेत. तात्पुरती मतदान केंद्रांची संख्या 283 इतकी आहे. मतदान केंद्र स्थलांतर आणि तात्पुरती शेडची उभारणी ही सर्व कामे मंगळवारपर्यंत (दि.15) पूर्ण होणार असल्याचे राम यांनी सांगितले.
पुणे शहरात 8 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. शहरातील 728 मतदान केंद्रांमध्ये बदल केला असून, यामध्ये कसबा पेठ मतदारसंघात 27 मतदान केंद्र, हडपसर 136, पर्वती 91, खडकवासला 140, कोथरुड 141, शिवाजीनगर 98 आणि वडगावशेरी 175 मतदान केंद्रांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील आंबेगाव 2, खेड 10, दौंड 2, इंदापूर 3, पुरंदर 33, भोर 27, मावळ 3, चिंचवड 175, पिंपरी 145, भोसरी 45 मतदान केंद्रांमध्ये बदल केला आहे. या बदलेल्या मतदान केंद्रांची माहिती नागरिकांना होण्यासाठी माहिती देणारे
फलक, तसेच व्होटर स्लीपवर मतदान केंद्रांचा पत्ता, तसेच गुगल मॅप नकाशा असणार आहे, जेणेकरून मतदारांना आपले मतदान केंद्र कुठे आहे, याची माहिती समजणार असल्याचे राम यांनी सांगितले.