ढाका : नोबेल पुरस्कार विजेते आणि ग्रामीण बॅंकेचे संस्थापक मुहम्मद युनुस यांच्याविरोधात ढाक्याच्या एका कोर्टाने बुधवारी अटक वॉरंट जारी केले. कामगार कायद्याच्या उल्लंघनाच्या एका प्रकरणात व्यक्तीशः उपस्थित न झाल्यामुळे हे अटक वॉरंट बजावण्यात आले आहे.
ग्रामीण बॅंकेच्या आयटी शाखेत ग्रामीण कम्युनिकेशन्सच्या तीन कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्याच्या खटल्याची सुनावणी 10 जुलै रोजी ढाक्यातील कामगार कोर्टात चालू होती. युनूस व इतर दोन जणांना 8 ऑक्टोबरला हजर होण्याचे आदेश दिले गेले होते. युनूस हे ग्रामीण कम्युनिकेशन्सचे अध्यक्ष आहेत.
ग्रामीण कम्युनिकेशन्सचे दोन वरिष्ठ अधिकारी न्यायालयासमोर हजर झाले असले तरी युनुस परत येऊ शकले नाहीत, त्यानंतर कोर्टाचे अध्यक्ष रोहिबुल इस्लाम यांनी त्यांच्याविरूद्ध अटक वॉरंट बजावले, असे कोर्टाच्या अधिकाऱ्याने सांगितले. कोर्टासमोर उपस्थित झालेल्या दोन अधिकाऱ्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
ग्रामीण कम्युनिकेशन्सच्या तीन माजी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी कामगार संघटना स्थापनेसाठी जून महिन्यात जोरदार प्रयत्न केले होते. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने या तिघांना बडतर्फ केले होते. त्यानंतर या तिघांनी कंपनी व्यवस्थापनावर फौजदारी खटले दाखल केले आहेत. त्रा
स देण्यासाठी बदली, धमकी देणे व त्यानंतर कामगार संघटना स्थापन केल्याबद्दल त्यांना काढून टाकण्यासाठी या तिघांनी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. 2015 मध्येही बांगलादेशच्या महसूल अधिकाऱ्यांनी युनुस यांना 1.51 दशलक्ष डॉलर पेक्षा जास्त कर न भरल्याबद्दल समन्स बजावले होते. त्यामुळेही युनुस वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.