कोरेगाव – लोहमार्ग दुहेरीकरण व इंटरलॉकिंगच्या कामासाठी मिरज ते पुणे आणि मिरज ते घटप्रभा या दरम्यान दि. 12 जानेवारी 2024 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे मिरज-कोल्हापूर, मिरज- कुर्डुवाडी, कोल्हापूर-सांगली आणि सांगली-मिरज या मार्गावर धावणार्या सर्व डेमू पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या बदललेल्या वेळापत्रकामुळे ऐन सुट्टीच्या हंगामात प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
मिरज-लोंढा आणि मिरज-कॅसलरॉक या गाड्या घटप्रभापर्यंतच धावणार आहेत. बंगळुरू-मिरज राणी चेन्नम्मा एक्सप्रेस बेळगावपर्यंत धावणार आहे. पुणे-कोल्हापूर ही रात्रीी स्पेशल सह्याद्री एक्सप्रेस मंगळवारपासून, 9 जानेवारी आणि 12 ते 14 जानेवारी या कालावधीत रद्द करण्यात आली आहे. बंगळुरू-अजमेर, जोधपूर, गांधीधाम या गाड्या दोन दिवस वळवण्यात आल्या असून, इतर दिवशी त्या एक ते दोन तासांच्या विलंबाने धावणार आहेत. हमसफर एक्सप्रेस एक ते दोन तासांच्या विलंबाने धावणार आहे. कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस आणि कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस सुरू राहणार आहेत. धनबाद-कोल्हापूर आणि पंढरपूरमार्गे नागपूर-कोल्हापूर या साप्ताहिक गाड्या पंढरपूरपर्यंतच धावणार आहेत. या कामामुळे प्रवाशांना होणार्या त्रासाबद्दल रेल्वे प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.