shiva vazarkar – चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञातांनी युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर याची हत्या करण्यात आली आहे. संबंधित घटना ही चंद्रपुरातील सरकारनगर परिसरात घडली आहे.
३० वर्षीय शिवा वझरकर याचा मृतदेह त्यांच्याच एका मित्राच्या कार्यालयाजवळच आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
शिवा वझरकर यांच्या समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि इतर वाहनांची तोडफोड केली आहे. पोलीस विभाग प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हाय अलर्टवर असताना झालेल्या या हत्येनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढ करण्यात आली आहे.
हत्येच्या घटनेनंतर वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. वझरकर यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शव चिकित्सा कक्षात पाठवण्यात आला आहे.
या घटनेनंतर उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. वादाचे रुपांतर हत्येत झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे.
परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. युवासेना शहरप्रमुख शिवा वझरकर हत्या प्रकरणात पोलिसांनी राजकीय पक्षातील माजी पदाधिकारी व सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुलाला अटक केली आहे.