नवी दिल्ली – विमानातील एका प्रवाशाने विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच इमर्जन्सी दरवाजे उघडून विमानाच्या पंखावर स्वार होण्याचा विचित्र पराक्रम केल्याची घटना समोर आली आहे. विमानतळाच्या प्रशासनाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या प्रवाशाला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे, असेही विमानतळाच्या प्रशासनाने म्हटले आहे.मेक्सिकोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी हा सर्व प्रकार घडला.
मात्र याच विमानातील अनेक प्रवाशांनी स्वाक्षरी करून एक निवेदन प्रशासनाला दिले आहे. दरवाजा उघडण्यासाठी आपणच या प्रवाशाला मदत केली होती, असे या सर्व प्रवाशांनी मान्य केले. विमान उड्डाण करण्यास तयार असूनही तब्बल ४ तास वाट बघायला लागली होती.
यावेळी विमानामध्ये हवा देखील येत नव्हती. त्यामुळे सर्व प्रवाशांना वाचवण्यासाठीच इमर्जन्सी दरवाजे उघडण्यात आले होते. नंतर कोणालाही इजा न पोचवता हा प्रवासी पुन्हा विमानामध्ये आला होता, असे या निवेदनामध्ये म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय सुरक्षा नियमांचे पालन करत हा प्रवासी स्वतःहून प्रशासनाच्या स्वाधीन झाला होता. किमान ७७ प्रवाशांनी स्वाक्षरी केलेले हस्तलिखित निवेदन आणि घटनेचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. एरो मेक्सिको कंपनीचे हा विमान ग्वाटेमालाला जाण्यासाठी तयार असताना हा प्रकार घडला.