समर्थक अस्वस्थ, कराड उत्तरमध्ये शिवसेनेचा निष्ठावंत उमेदवार कोण याची चर्चा सुरू
संदीप मोरे
रहिमतपूर –विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. भाजपचे मनोज घोरपडे कराड उत्तर विधानसभा निवडणूक लढवणारच नव्हे तर जिंकणारच म्हणून जोशात आहेत. लोकसभेच्या प्रचाराबरोबरच कराड उत्तरमध्ये घोरपडे यांनी आपल्या प्रचाराची रंगीत तालीम केली आहे. त्यांचे समर्थक सोसल मीडियावर भावी आमदार म्हणून घोरपडे यांना प्रोजेक्ट करीत आहेत.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांना 65 हजार पेक्षा जास्त मते मिळवून दिली आहेत. त्यांची विधानसभेसाठी जय्यत तयारीत असतानाच उब्रंज येथील कार्यक्रमात कराड उत्तर शिवसेनेचाच असून निष्ठावंत उमेदवार उभा करणारच, या शिवसेना नेते नितीन बानगुडे पाटील यांच्या भीमगर्जनेमुळे मनोज घोरपडे समर्थकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे.
घोरपडे यांनी कराड उत्तर विधानसभा लढवायचीच जोरदार तयारी केली आहे. पाच वर्षांपूर्वी निवडणुकीला सामोरे जाताना शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या घोरपडेंनी भाजपमध्ये प्रवेश करीत मतदारसंघात चांगलीच हवा निर्माण केली. त्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाच्या मतावर त्यांना समाधान मानावे लागले.
येणारी विधानसभा जिंकायचीच याचा चंग बांधत घोरपडेंनी गेल्या साडेचार वर्षात संपूर्ण मतदारसंघात चांगले वातावरण निर्माण केले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नरेंद्र पाटील यांचे चिन्ह धनुष्यबाण असले तरीही मिळालेली 65 हजार मते घोरपडे यांच्या प्रयत्नातून मिळाली आहेत. विधानसभा निवडणुकीपेक्षा वीस हजारांपेक्षा जास्त मतांची वाढ झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. नुकत्याच झालेल्या वाढदिवस कार्यक्रमात तर व्यासपीठावरील अनेक मान्यवरांनी समोरील गर्दी पाहून मनोज घोरपडे आमदार झालेच म्हणून जाहीर करुनही टाकले.
निवडणुक तोंडावर आली असतानाच नितीन बानगुडे पाटील यांनी उमेदवारीचा मोठाच तिढा करून ठेवला. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नरेंद्र पाटील यांना त्यांनीच शिवसेनेत प्रवेश करायला लावला व पाटील यांना शिवसेनेकडून निवडणूक लढायला भाग पाडले. पण मतदारसंघ भाजपला सोडला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतसुद्धा बानुगडे पाटील आपला हेका कायम ठेवून कराड उत्तर सेनेच्या चिन्हावरच लढवणारच असे दिसते. पण त्याहीपेक्षा उमेदवारी निष्ठावंत शिवसैनिकालाच मिळेल, असे जाहीर केल्यामुळे कराड उत्तरमध्ये शिवसेनेचा निष्ठावंत कोण, याची चर्चा रंगली आहे. परंतु कराड उत्तर मतदारसंघात शिवसेनेला उमेदवार शोधावा लागणार आहे.
नाहीच मिळाला तर आयात उमेदवारी उमेदवार तरी चालणार का की बानगुडे पाटील स्वतःच निवडणुकीला सामोरे जाणार, अशा अनेक तर्कवितर्कांना सुरवात झाली आहे. बानगुडे पाटील यांचा हा घरचा मतदारसंघ आहे. ते रहिमतपूरमध्ये राहत असून त्याबरोबरच बानुगडेवाडी (ता. कराड) हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यामुळे बानगुडे पाटील स्वतः उमेदवार असतील तर मनोज घोरपडे यांना थांबावे लागेल. घोरपडे यांच्या भावी आमदारकीमध्ये बानुगडे पाटील यांचाच अडथळा होणार की काय याचीच चिंता समर्थकांना लागली आहे.