Chandra Mohan – तेलुगू चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते चंद्र मोहन (Chandra Mohan) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
त्यांच्या पश्चात पत्नी जालंधर आणि दोन मुले असा परिवार आहे. सोमवारी (13 नोव्हेंबर) हैदराबादमध्ये चंद्र मोहन (Chandra Mohan) यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अभिनेते चिरंजीवी यांनी ट्विटरवर ट्वीट शेअर करुन चंद्र मोहन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. चिरंजीवी यांनी ट्वीटमध्ये लिहिले, “सिरीसिरिमुव्वा, संकरभरणम, राधाकल्याणम आणि नाकू यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अष्टपैलू अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते आणि नायक चंद्र मोहन गरू यांचे निधन झाले, हे जाणून अतिशय दुःख झाले.
“प्रणाम खरिदू’ या माझ्या पहिल्याच चित्रपटात त्यांनी उत्कृष्ट अभिनय केला. त्या प्रसंगी आमची ओळख झाली, नंतर आमच्यात मैत्री झाली. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांसाठी माझ्या मनापासून संवेदना.
दरम्यान, चंद्र मोहन यांनी 1966मध्ये “रंगुला रत्नम’ या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांनी सुमारे 900 चित्रपटांमध्ये काम केले आहे. मल्लमपल्ली चंद्रशेखर राव हे चंद्र मोहन यांचे खरे नाव होते.