नवी दिल्ली – नेट झिरोसाठी विद्यापीठातील (Net zero) तरुणांना कौशल्य मिळवून देणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) यांच्या व्हिजनचा एक भाग असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash javadekar) यांने केले. दिल्ली विद्यापीठाच्या विस्तीर्ण कॅम्पसमध्ये सुमारे 30 विद्यापीठे आणि 45 महाविद्यालयांमध्ये नेट झिरो या मोहिमेचा शुभारंभ झाला. यासाठी आयोजित कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठ परिसरांना कार्बन न्यूट्रल आणि नेट झिरो करण्यासाठीची “यू75′ या राष्ट्रीय चळवळीला यावेळी हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
“यू75′ ही नेट झिरो चळवळ आहे जी भारतीय स्वातंत्र्याच्या 55व्या वर्धापन दिनानंतर पहिल्या वर्षी सुरू झाली. विद्यापीठ कॅम्पसमध्ये नेट-झिरो चळवळ ही केवळ टॅगलाइन नाही तर शाश्वत विकास उद्दिष्टे लागू करणे आणि पॅरिस हवामान कराराच्या वचनांची पूर्तता करणे हा राष्ट्रीय हेतू त्यामागे आहे, असे दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. योगेश सिंग (Pro.yogesh singh) यांनी केले. विद्यार्थी व उच्च शिक्षण संस्थांमधील भागीदारी आणि संवादामध्ये हवामान बदलावरील कारवाईला गती देण्याचे सामर्थ्य आहे यावर त्यांनी भर दिला.
ग्रीन तेर फाउंडेशनच्या पुढाकाराने ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी 350हून अधिक आणि प्राध्यापक उपस्थित होते. विद्यापीठ तसेच महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये नेट झिरो मोहिम सुरू करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन या कार्यशाळेत विविध तज्ज्ञांनी केले. त्यात ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि संयुक्त राष्ट्राचे माजी अंडर-सेक्रेटरी-जनरल एरिक सोल्हेम, युनेस्को निधीचे संचालक टिम कर्टिस, अखिल भारतीय उच्च तंत्रशिक्षण परिषदेच्या संचालक डॉ. ममता राणी अग्रवाल आदींचा समावेश होता.
पश्चिम आणि दक्षिण भारतात ही मोहिम यापूर्वीच सुरू झाली आहे. त्यासाठी पुणे आणि चेन्नईत तज्ज्ञांच्या कार्यशाळा झाल्या आहेत. आता उत्तरेतील शिक्षण संस्थांसाठी दिल्लीत कार्यशाळा घेण्यात आली. नेट झिरो या मोहिमेद्वारे विदयापीठ आणि महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये पर्यावरणपूरक बाबींची रेलचेल असणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाप्रती विशेष जनजागृती केली जाणार आहे. ग्रीन तेर फाऊंडेशनचे संस्थापक संचालक आणि युनेपचे माजी संचालक डॉ. राजेंद्र शेंडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.