अभिनेत्री उर्वशी रौतालाने अलीकडेच आपल्या “अनाम’ या चित्रपटाचे चित्रीकरण आटोपले आणि सुटकेचा निःश्वास टाकला. 2017 मध्ये आलेल्या “थिरुट्टू पायाले 2′ सुपरहिट तामिळी चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. उर्वशीने अलीकडेच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
त्यामध्ये वाराणसीमध्ये गंगा नदीत एका बोटीच्या माध्यमातून जलविहाराचा आनंद लुटताना दिसत आहे. त्यावर उर्वशीने लिहिले आहे की, माझ्या आयुष्यातील सर्वांत आव्हानात्मक आणि कठीण भूमिका म्हणून “अनाम’ मधील व्यक्तिरेखेकडे पाहते. पागलपंतीनंतरच्या या खास प्रवासाबाबत मी आनंदी आहे.
या चित्रपटात तिच्यासोबत विनीत कुमार आणि अक्षय ओबेरॉय हे दोन कलाकार नायक म्हणून असणार आहेत. चित्रपटातील उर्वशीची व्यक्तिरेखा काहीशी डी-ग्लॅम किंवा फारशी उठावदार नसणारी आहे. पण तरीही उर्वशी या चित्रपटाबाबत खूप उत्साही आहे. ती सांगते की, कोणतीही आव्हानात्मक भूमिका करण्यात मला लाज वाटत नाही. उलट अशा वेळी मी अधिक उत्साही असते. मी प्रत्येक भूमिका समरसून करतानाच तिला वास्तविकतेची जोड देण्याचा प्रयत्न करते.