‘उद्यान’ वृक्षलागवडीची उद्दिष्टपूर्ती होईना

पिंपरी – पर्यावरणाचा ढासळता आलेख बघता पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्य शासनाच्या उपक्रमात सहभाग घेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने यंदा दीड लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, ठरवलेल्या मुदतीत लक्ष्य पूर्ण करण्यास उद्यान विभागाला अपयश आले आहे.

महाराष्ट्र राज्याचा पर्यावरण समतोल राखण्यासाठी एकूण भूक्षेत्राच्या 33 टक्के वनक्षेत्र असणे गरजेचे आहे. मात्र, राज्यात आजघडीला फक्त 20 टक्केच वनक्षेत्र असल्याने राज्य शासनाच्या वन मंत्रालयाकडून दरवर्षी वृक्षलागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यानुसार 2019 पर्यंत 50 कोटी वृक्षलागवड करण्याचे ठरवण्यात आले आहे. या उपक्रमात राज्यातील सर्वच विभागांनी सहभाग घेतला आहे.

यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने यंदा दीड लाख वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला होता. ही वृक्षलागवड सप्टेंबर अखेरपर्यंत होणे अपेक्षित होती. मात्र, अद्याप उद्यान विभागाला ती पूर्ण करण्यात यश आले नाही. 20 डिसेंबरपर्यंत उद्यान विभागाने 1 लाख 42 हजार 895 वृक्षांचीच लागवड केली आहे. गेल्यावर्षी शहरात 60 हजार वृक्षलागवड करण्याचे लक्ष्य उद्यान विभागाकडून ठेवण्यात आले होते. यंदा हेच लक्ष्य तिपटीने वाढवण्यात आले. परंतु चांगला पाऊस पडला असला तरी उद्यान विभागाला अपेक्षित लक्ष्यपूर्ती करता आली नाही.

शहरात करण्यात आलेली वृक्षलागवड
प्रभाग अ- 600, ब- 870, क- 3,237, ड- 583, इ- 1,592, फ-1,296, ह-1,458, ग-152, तर, उद्यानातील वृक्षारोपण-1,454, दुर्गादेवी टेकडी-1,049, मेट्रोमार्फत-4,000, औंध मिल्ट्री हद्दीत-3,500, मिलिटरी हद्द दिघी-3,500, मिलिटरी हद्द तळवडे-1,500, पिंपरी डेअरी फार्म-10,000, गृहरचना संस्था-6,990, रोपवाटीकेतून विक्री व वाटप-24,614 अशी एकूण 1 लाख 42 हजार 895 वृक्षलागवड उद्यान विभागाकडून करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.