पुणे – “गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये सरकारला 70 हजार कोटींची गुंतवणूक करावी लागली, अन्यथा या बॅंका अडचणीत आल्या असत्या. ही बाब माझ्या मनाला अस्वस्थ करणारी आहे. सहकारी बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे होतात, हा गैरसमज दूर करून केंद्र सरकारने सहकारी बॅंकांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे,’ असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष व पद्मविभूषण शरद पवार यांनी व्यक्त केले.
दि विश्वेश्वर सहकारी बॅंक लि. पुणे यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित करण्यात आला. यावेळी बॅंकेच्या 50 वर्षांची वाटचाल दर्शविणाऱ्या गौरविकेचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याबरोबरच रिझर्व्ह बॅंकेने दि विश्वेश्वर बॅंकेच्या इंटरनेट बॅंकिंग सुविधेला नुकतीच परवानगी दिली, या सेवेचे उद्घाटनदेखील पवार यांनी केले.डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर, सहकार व बॅंकिंग विषयाचे तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, बॅंकेचे अध्यक्ष सुनील रुकारी, बॅंकेच्या सुवर्ण महोत्सवी समितीचे कार्याध्यक्ष अनिल गाडवे, उपाध्यक्ष अजय डोईजड, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम आपटे, गौरविकेचे संपादक विद्याधर ताठे, माजी आमदार उल्हास पवार, बॅंकेचे संचालक दत्तात्रय कामठे, सुभाष लडगे आणि बापूसाहेब धनकवडे आदी यावेळी उपस्थित होते.
अनास्कर म्हणाले, आज सहकार क्षेत्राचे नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्र, त्यातही पुण्यातील दि विश्वेश्वर बॅंकच योग्य आहे असे मला वाटते. नुकतीच इंटरनेट सुविधा देणाऱ्या रिझर्व्ह बॅंकेच्या इंस्पेक्टिंग ऍथॉरिटीने दि विश्वेश्वर बॅंकेचे कौतुक केले आहे आणि ही गोष्ट गौरवास्पद आहे. यावेळी गो. बं. देगलूरकर, खासदार श्रीनिवास पाटील यांनी मार्गदर्शन केले. अनिल गाडवे यांनी उपस्थितांचे स्वागत, सुनील रुकरी यांनी प्रास्ताविक केले.
दि विश्वेश्वर बॅंकेचे कौतुक
कोणत्याही बॅंकेची स्थिती चांगली की वाईट हे समजण्यासाठी त्याचा निव्वळ एनपीए किती हे पहावा. ही त्या बॅंकेची नाडी परीक्षा म्हणता येईल. दि विश्वेश्वर सहकारी बॅंकेचा हा निव्वळ एनपीए 1.34 टक्के इतका कमी आहे यामध्ये संचालक मंडळ, भागीदार, खातेदार व ग्राहक यांचा महत्त्वाचा वाटा आहे असे सांगत शरद पवार यांनी दि विश्वेश्वर बॅंकेचे कौतुक केले.