नवी दिल्ली – केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या (सीएपीएफ) जवानांचा समावेश फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे त्या जवानांनाही 10 जानेवारीपासून करोनालसींचे बूस्टर डोस मिळणार आहेत.
केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), भारत-तिबेट सीमा पोलीस दल (आयटीबीपी) आणि सशस्त्र सीमा बल (एसएसबी) केंद्रीय सशस्त्र दले आहेत.
त्या दलांचे जवानही तिसऱ्या डोससाठी पात्र आहेत. बूस्टर किंवा प्रीकॉशन डोस सीआरपीएफ जवानांच्या दृष्टीने अधिक महत्वाचा मानला जात आहे. त्या दलावर देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी आहे.
निवडणुकांवेळीही सीआरपीएफचे जवान बंदोबस्तासाठी तैनात केले जातात. लवकरच पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर, फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या श्रेणीत समावेश करून निवडणूक कर्मचाऱ्यांनाही बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.