सेंच्युरीयन – पहिल्या डावात फलंदाजांनी तर, दुसऱ्या डावात गोलंदाजांनी कमावले असे चित्र निर्माण करत भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या परिस्थितीचे वर्णन करता येईल. त्यांना विजयासाठी भारताने 305 धावांचे आव्हान ठेवले व चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावात 4 बाद 94 धावा अशी स्थिती बनली असून ते अद्याप 211 धावांनी पिछाडीवर आहेत. भारताला या कसोटीसह मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी आहे.
भारताचा दुसरा डाव जरी 174 धावांवर संपुष्टात आला असला तरीही पहिल्या डावातील महत्त्वपूर्ण 130 धावांच्या आघाडीमुळे त्यांनी यजमान दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 305 धावांचे आव्हान ठेवले आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात एडन मार्करम, केगीन पीटरसन व रुसी वॅन दर दुसेन यांनी साफ निराशा केली. एका बाजूने डीन एल्गर नाबाद 52 धावांच्या जिद्दी खेळीसह नाबाद आहे. त्यांच्या दुसऱ्या डावातील 41 व्या षटकातील बुमराहने टाकलेल्या पाचव्या चेंडूवर केशव महाराज त्रिफळाबाद झाला व पंचांनी चौथ्या दिवसाचा खेळ थांबवला. भारताकडून जसप्रीत बुमराहने 2 गडी बाद केले. महंमद शमी व महंमद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी, मंगळवारच्या 1 बाद 16 धावांवरून पुढे खेळ सुरू झाल्यावर लोकेश राहुल व शार्दुल ठाकूर यांनी साफ निराशा केली. पहिल्या डावात शतकी खेळी केलेल्या राहुलने 23 धावा केल्या. त्यानंतर तळात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने 34 तर अजिंक्य रहाणेने 20 धावा केल्या.
कर्णधार विराट कोहलीने 18, चेतेश्वर पुजारा 16 व रवीचंद्रन अश्विनने 14 धावा केल्या.
भारताच्या दुसऱ्या डावात एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारताचा दुसरा डाव 50.3 षटकांत 174 धावांवर संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा व मार्को जेन्सन यांनी प्रत्येकी 4 गडी बाद केले. लुंगी एन्जीडीने 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – भारत पहिला डाव – 327 धावा. दक्षिण आफ्रिका पहिला डाव – 197 धावा. भारत दुसरा डाव – 50.3 षटकांत सर्वबाद 174 धावा. (ऋषभ पंत 34, लोकेश राहुल 23, अजिंक्य रहाणे 20, चेतेश्वर पुजारा 16, रवीचंद्रन अश्विन 14, शार्दुल ठाकूर 10, अवांतर 27, कागिसो रबाडा 4-42, मार्को जेन्सन 4-55, लुंगी एन्जीडी 2-31) दक्षिण आफ्रिका दुसरा डाव – 40.5 षटकांत 4 बाद 94 धावा. (केगीन पीटरसन 17, डीन एल्गर खेळत आहे 52, जसप्रीत बुमराह 2-22, महंमद सिराज 1-25, महंमद शमी 1-29).