बारामती – करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुढे येणारे सण, उत्सव समारंभ साधेपणाने गर्दी न करता साजरे करावेत, बाधीतांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनामध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. बारामती परिसरात सुरु असणारी विकासकामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बारामती परिसरातील विकासकामांच्या पहाणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात करोनाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे,
अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, गटविकास अधिकारी अनिल बागल, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता राहूल पवार, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धोडपकर, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे,
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, रुई ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. सुनील दराडे, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेते सचिन सातव उपस्थित होते.
पवार म्हणाले की, सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. प्रादुर्भाव लक्षात घेता सण समारंभ गर्दी न करता साजरे करावेत. बाधींतांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनामध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरुन बारामती शहरात तसेच ग्रामीण भागात सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. बारामती तालुक्यात कोविड लसीकरणाबाबत समाधान व्यक्त केले.
पवार म्हणाले, सामाजिक दायित्वातून क्रांतीदेवी बजात ट्रस्टने पुणे जिल्ह्यासाठी दीड लाख लस दिली हे काम खरोखरच कौतुकस्पद आहे. स्वयंसेवा संस्थाचे अशा प्रकारचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे. बैठकीपूर्वी पवार यांनी कन्हेरी येथील फळरोपवाटिका व वन उद्यान, देसाई इस्टेट आणि क्रिडा संकुल कॅनालवरील सुशोभिकरण आदी कामांची पाहणी करुन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विकासकामांबाबत योग्य त्या सूचना दिल्या.
सर्वच विभागांनी विकासकामे समन्वयाने पार पाडावीत. निधीचा पुरेपूर वापर करावा. विकासकामे दर्जेदार झाली पाहीजेत. निधीची मागणी असल्यास प्रस्ताव सादर करावेत. सर्वानीच जबाबदारी स्वीकारून कामे करणे आवश्यक आहे.
नवीन इंटरसेप्टर वाहनाचे पूजन
परिवहन आयुक्त कार्यालयातून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी मिळालेल्या नवीन इंटरसेप्टर वाहनाचे पूजन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशार पाटील, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, मोटार वाहन निरीक्षक चंद्रमोहन साळोखे व नंदकिशोर काळे उपस्थित होते.
वाहनामध्ये स्पीड गन, ब्रीथ नालायझर व टील्ट मीटर बसविले आहेत. त्यामुळे रोडवरील जादा स्पीडची वाहने तसेच नशा करुन चालवणारी वाहणे पकडण्यास मदत होणार आहे.