पुणे – महर्षी कर्वे यांच्या द्रष्टेपणाला विठ्ठलदास ठाकरसी यांचे आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळे विद्यापीठाचे स्वप्न साकार होऊ शकले. भारतातील महिलांच्या प्रगतीमध्ये “एसएनडीटी’ विद्यापीठ हे मैलाचा दगड ठरले आहे, असे प्रतिपादन कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समिती सदस्या प्रा. विद्या देशपांडे यांनी केले.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रयत्नांतून 5 जुलै 1916 रोजी स्थापन झालेल्या “एसएनडीटी’ या दक्षिण-पूर्व आशियातील पहिल्या महिला विद्यापीठाचा 105वा वर्धापनदिन पुण्यातील शैक्षणिक संकुलात मोठ्या उत्साहाने साजरा झाला. सनईच्या सुरांनी आणि विद्युत रोषणाईने “एसएनडीटी’ पुणे आवार उजळून निघाला होता. अध्यक्षस्थानी अध्यक्षस्थानी गृहविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मुक्तजा मठकरी उपस्थित होत्या. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्राचार्य डॉ. मुक्तजा मठकरी यांनी विद्यापीठाच्या गौरवशाली परंपरांचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे विद्यापीठाशी संबंधित आगामी आव्हाने आणि त्यावरील संभाव्य उपाययोजनाचा उहापोह केला. त्यापूर्वी “एसएनडीटी’ विद्यापीठाच्या पुणे आवारातील कर्वे कुटिर येथे भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. डॉ. नलिनी पाटील यांनी प्रास्ताविक आणि प्रा. हेमंत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. श्रीमती रत्नपारखी यांनी आभार मानले.