सोरतापवाडी(प्रतिनिधी) – उरुळी कांचन (ता. हवेली) येथे करोनाचा कहर सुरू आहे. दोन दिवसांमध्ये 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये तीन महिला व दोन पुरुष आहेत. त्यांच्या संपर्कातील एकूण 18 जणांना होमक्वारंटाइन करण्यात आले असून त्यांचा स्वॅब सोमवारी (दि. 6) तपासणीसाठी पाठण्यात येणार असल्याची माहिती उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. सुचेता कदम यांनी दिली.
उरुळी कांचनमध्ये शनिवारी (दि. 4) एका गर्भवती महिलेसह तिघांना तर रविवारी (दि. 5) दोन महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या पाच जणांपैकी तिघांवर लोणी काळभोर येथील खासगी दवाखान्यात तर दोघे पुण्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उरुळी कांचनमध्ये अडीच महिन्यांपूर्वी 47 वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आली होती. त्यानंतर ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने चांगले नियोजन करून करोनाचा शिरकाव रोखण्यास यशस्वी झाले होते. पण गेल्या 15 दिवसांपासून उरुळी कांचन येथे सतत रुग्ण सापडत असल्याने नागरिकांनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या 22 वर पोहोचली आहे.