जुन्नर – साडेतीन मुहूर्तापैकी असलेला अक्षय तृतीया आणि रमजान ईद हे दोन्ही पवित्र सण घरातच साजरे करावे. तसेच ईदनिमित सामुहिक पठण होणार नाही, याकडे लक्ष द्या, असे आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी केले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर अक्षयतृतीया, रमजान ईद सण शांततेत व गर्दी न करता साजरे होण्यासाठी जुन्नर पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत डॉ. देशमुख बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्त अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय अधिकारी मंदार जवळे, नगराध्यक्ष शाम पांडे,
तहसीलदार हणमंत कोळेकर, मुख्याधिकारी मच्छींद्र घोलप यांच्यासह जुन्नर शहरातील नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, हिंदू-मुस्लीम समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.डॉ. देशमुख म्हणाले की, अक्षय तृतीयेला होणारी जुन्नरची शिवाई देवीची यात्रा देखील रद्द करण्यात आली आहे.
तर या मुहूर्तावर हिंदू बांधव नवीन कार्याचा आरंभ करतात तसेच खरेदीही करतात; परंतु कोविड संकटामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी होवून संसर्ग वाढण्याची कृती करू नये. सामाजिक जबाबदारी पार पाडून नकारात्मकता पसरणार नाही तसेच आरोग्याची काळजी घेणेचा दृष्टिकोन ठेवावा. गेल्या वर्षी ज्या पद्धतीने घरातून सण साजरा करून सहकार्य केले तसेच सहकार्य यावेळेस देखील करावे, असे आवाहन त्यांनी केले.
…तर कारवाई
समाज माध्यमांवर चुकीचे संदेश पाठवून गैरवापर करून दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होण्याची घटना घडू नये, प्रसंगी अशा पोस्ट करणाऱ्यां विरुद्ध पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाईचा बडगा उगारण्यात येईल.
व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमीनने जातीय विद्वेष पसरविणाऱ्या पोस्ट टाकण्यात येवू नये याकरीता ग्रुप सदस्यांना तशा स्पष्ट सूचना द्याव्यात, असे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्पष्ट केले.