खडकवासला जॅकवेलवर लवकरच सीसीटीव्ही

महापौर आणि पालकमंत्र्यांची दिली भेट : मुंढवा जॅकवेलचीही पाहणी

पुणे – खडकवासला धरणावरील जॅकवेल येथील “स्काडा’ यंत्रणेवर बसवण्यात आलेल्या जलमापकांवरील रीडींग थेट जॅकवेलपासून महापालिका भवन येथे उपलब्ध करून देण्याबाबत आणि तेथे सीसीटीव्ही बसवण्याबाबतच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

महापौर मुक्ता टिळक यांच्या समवेत बापट यांनी खडकवासला धरणक्षेत्र आणि मुंढवा जॅकवेलची पाहणी केली. यावेळी आमदार बाबुराव पाचर्णे, स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक प्रसन्न जगताप आणि आनंद रिठे, भाजप कार्यकर्ते उज्ज्वल केसकर, महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या सद्यस्थिती विषयी चर्चा करण्यात आली. त्यामध्ये उपलब्ध पाणीसाठा जुलैअखेरपर्यंत वापरायचा असेल, तर पाणी काटकसरीनेच वापरले पाहिजे असा निष्कर्ष यावेळी काढण्यात आला.
याशिवाय या सर्वांनी मुंढवा जॅकवेल पंपिंग हाऊसचीही पाहणी केली. त्यामध्ये नदीत वाढलेल्या जलपर्णीवर उपाययोजना करण्यासंबंधीच्या सूचना अधिकाऱ्यांना बापट यांनी केल्या.

जलपर्णी असल्याने पंप हाऊस बंद आहेत. ते सुरू करण्यासाठी यंत्रना त्वरित बसवून येत्या दोन दिवसांत ते पंपीग सुरू करण्याच्या सूचनाही बापट यांनी दिल्या. हे केल्याने बेबी कॅनलमधून शेतीसाठी पाणी उपलब्ध करणे शक्‍य होणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

ही जलपर्णी काढण्यासाठी वाहन विभागाला जादाचे जेसीबी आणि स्पायडर मशीन्स त्वरित उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना बापट यांएने दिल्या. येत्या दोन दिवसांत ही उपकरणे उपलब्ध होतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जलपर्णी काढल्यानंतर डासनिवारनासाठी त्वरित औषधांची फवारणी करण्यात येईल. यासाठी इतर खासगी स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेतली जाणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.

खराडी बंधाऱ्याबद्दलही प्रश्‍न
खराडी येथील बंधाऱ्यावर बसवण्यात आलेल्या गेटमुळे नदीतून पाणी कमी जात असल्याची बाब शिरूरचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या निदर्शनाला आणून दिले मात्र त्यावर कोणताच निर्णय घेण्यात आला नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.