देशात 88.78; पुणे विभागात 90.24 % उत्तीर्ण
38,686 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांवर गुण
पुणे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. परीक्षेचा एकूण निकाल 88.78 टक्के लागला असून मागील वर्षापेक्षा यंदा 5.38 टक्क्यांनी निकाल वाढला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल 5.96 टक्क्यांनी अधिक लागला आहे. तर, करोनाच्या प्रादुर्भावामुळे गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही.
फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली. केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करत परीक्षेचा निकाल जाहीर केल्याची माहिती दिली आहे. सीबीएसईच्या एकूण 13 हजार 109 शाळा आहेत. परीक्षेसाठी 4 हजार 984 केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. परीक्षेसाठी 12 लाख 3 हजार 595 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
मागील वर्षी मुलींचा निकाल 88.70 टक्के एवढा लागला होता. यंदा तो 92.15 टक्के एवढा लागला आहे. मुलांचा निकाल मागील वर्षी 79.40 टक्के लागला होता. आता तो 86.19 टक्के लागला आहे. निकालात मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या आहेत. ट्रान्सजेंडरचा निकाल मागील वर्षी 83.33 टक्के एवढा होता. यंदा तो 66.67 टक्के लागला आहे. निकालात तब्बल 1 लाख 57 हजार 934 विद्यार्थ्यांना 90 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. यापैकी 38 हजार 686 म्हणजेच 3.24 टक्के विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. श्रेणीसुधारसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी देखील बोर्डाने दिली आहे.
मात्र, या परीक्षेची तारीख बोर्ड केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर जाहीर करणार आहे. दिल्ली विभागात 2 लाख 39 हजार 870 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील 2 लाख 37 हजार 901 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून 2 लाख 24 हजार 552 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विभागाचा एकूण निकाल 94.39 टक्के लागला आहे. सुमारे 400 विद्यार्थ्यांचे निकाल संगणकीकृत पद्धतीने व ठरलेल्या सूत्रानुसार जाहीर करता आलेले नाहीत. हे निकाल नंतर घोषित करण्यात येणार आहेत, असे सीबीएसई बोर्डाने जाहीर केले आहे.
विभागनिहाय निकाल (टक्के)
त्रिवेंद्रम्-97.67, बंगळुरू-97.05, चेन्नई-96.17, दिल्ली पश्चिम-94.61, दिल्ली पूर्व-94.24, पंचकुला-92.52, चंदीगड-92.04, भुवनेश्वर-91.46, भोपाळ-90.45, पुणे-90.24, अजमेर-87.60, नोयडा-84.87, गुवाटही-83.37, देहराडून-83.22, प्रयागराज-82.49, पाटणा-74.57.
वेबसाइट सुरू होण्यात अडचणी
सीबीएसई बारावीच्या निकालाची दुपारी 1 वाजता घोषणा होताच सीबीएसईची अधिकृत वेबसाइट क्रॅश झाली. एकाच वेळी अनेकांची ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी झुंबड उडाली. यामुळे वेबसाइट लवकर ओपन होण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी काही तास वाट पाहात बसावे लागले. सोशल मीडियावरदेखील अनेक विद्यार्थ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.