सेंट पीटर्सबर्ग: अमेरिकेत फ्लोरिडामध्ये रविवारी करोनाचे एकाच दिवसातील सर्वाधिक रुग्ण सापडण्याचा उच्चांक नोंदवला गेला. करोनाची साथ सुरू झाल्यापासून जगभरात कोणत्याही एका राज्यामध्ये एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने करोनाचे रुग्ण सापडलेले नाहीत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार फ्लोरिडामध्ये रविवारी एकाच दिवसात 15,299 रुग्णांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे फ्लोरिडातील एकूण रुग्णसंख्या 2,69,811 इतकी झाली आहे.
यापूर्वी एकाच दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्येचा विक्रम कॅलिफोर्नियाच्या नावावर होता. कॅलिफोर्नियामध्ये चारच दिवसांपूर्वी 11,694 रुग्णांची नोंद झाली होती. या आकडेवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर न्यूयॉर्कचा क्रमांक होता. तिथे 15 एप्रिल रोजी 11,571 रुग्ण सापडले होते.
फ्लोरिडातील करोनाबाधितांचे आकडे दिवसादिवसाला वाढत चालले आहेत. आतापर्यंत 514 जणांचा मृत्यू झाला असून रविवारी आणखी 45 बाधितांचा मृत्यू झाला. संपूर्ण मे आणि जून महिन्यात फ्लोरिडा प्रांतातील बहुतेक उद्योगधंदे काही निर्बंधांसह पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. आता तेथील चाचण्यांचे प्रमाणही वढवण्यात आले आहे.
मात्र आता पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळण्याचे प्रमाणही तितक्याच नाट्यमयरितीने वाढले आहे. महिन्याभरापूर्वी दिवसातील चाचण्यांच्या 5 टक्के रिपोर्ट पॉझिटिव्ह येत होते. आता 19 टक्के रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. त्याच प्रमाणात मृत्यूदरही वाढण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.