नवी दिल्ली- मणिपूरमध्ये सरकार स्थापनेचा दावा करणारे कॉंग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री ओ इबोबिसिंग यांना सीबीआय चौकशीचे समन्स जारी करण्यात आले आहेत. सन 2009 ते 2017 या अवधीत मणिपूर डेव्हलपमेंट सोसायटीत झालेल्या 332 कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर हे समन्स जारी करण्यात आले आहेत. त्यांच्या चौकशीसाठी सीबीआयचे पथक इम्फाळला पोहचले असून ते बुधवारी इबोबिसिंग यांची चौकशी करणार आहेत. त्यांच्या समवेतच तीन माजी आयएएस अधिकाऱ्यांचीही या प्रकरणात चौकशी केली जणार आहे.
मणिपूरमध्ये सत्तारूढ भाजप सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेऊन त्यांनी कॉंग्रेसला समर्थन दिले आहे. त्या आधारावर इबोबिसिंग यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापनेचाही दावा केला आहे. त्यांनी विद्यमान भाजप सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला असून त्यावर मतदान घेण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली होती.