नवी दिल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयची छापेमारी सुरू आहे. यावर पहिली प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वेळेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. ज्या दिवशी अमेरिकन वृत्तपत्रात सिसोदिया यांची प्रशंसा झाली त्याच दिवशी सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नवीन उत्पादन शुल्क धोरणात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून दिल्लीत हा छापा टाकण्यात आला आहे. गेल्या महिन्यात दिल्लीच्या एलजीने या प्रकरणाच्या चौकशीची शिफारस केली होती.
अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले की,”ज्या दिवशी दिल्लीच्या शिक्षण मॉडेलची प्रशंसा झाली आणि मनीष सिसोदियाचे छायाचित्र अमेरिकेतील सर्वात मोठे वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्या पानावर छापले गेले, त्याच दिवशी केंद्राने सीबीआयला मनीष सिसोदिया यांच्या घरी पाठवले. CBI आपले स्वागत आहे. आम्ही पूर्ण सहकार्य करु. यापूर्वीही अनेक तपास/ छापे पडले आहेत. काही बाहेर आले नाही. आताही काहीही निष्पन्न होणार नाही.”
केजरीवाल ट्विटमध्ये पुढे म्हणाले, “संपूर्ण जग दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्य मॉडेलवर चर्चा करत आहे. त्यांना हे थांबवायचे आहे. त्यामुळेच दिल्लीच्या आरोग्य आणि शिक्षण मंत्र्यांवर छापेमारी आणि अटक करण्यात अली आहे. 75 वर्षात ज्याने चांगले काम करण्याचा प्रयत्न केला त्याला रोखले गेले. त्यामुळे भारत मागे आहे. दिल्लीचे चांगले काम थांबू देणार नाही.’ असेही केजरीवाल म्हणाले.