नवी दिल्ली – केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने आज राजधानी दिल्ली आणि बिहारची राजधानी पाटणा येथील 9 ठिकाणी छापे घातले. राष्ट्रीय जनता दल या माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाचे आजी आणि माजी आमदारांच्या निवासस्थानीही छापे घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जमीनीच्या मोबदल्यात नौकरी प्रकरणाशी संबंधित ही छापेमारी असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. लालू यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले प्रेमचंद गुप्ता यांच्या नोएडा, दिल्ली आणि गुरूग्राम येथील ठिकाणेही सीबीआयच्या रडारवर होती.
राजदच्या आमदार किरण देवी आणि त्यांचे बाहुबली पती अरूण यादव यांच्या वडलोपार्जित घरात सीबीआयचे पथक कालपासून तपासणी करते आहे. हे जोडपेही लालू यांचे निकटवर्तीय मानले जाते. काही दिवसांपूर्वीच अरूण यादव यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला असून त्याची स्वतंत्र चौकशी केली जात होती. मात्र पुराव्या अभावी त्याला सोडण्यात आले.