मुंबई – मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत यांच्या बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच ‘आदिपुरुष’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसला आहे. तर, अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेचे पात्र साकारत आहे. तर रावणाचे पात्र सैफ अली खान साकारत आहे.
हा चित्रपट 16 जून रोजी जगभरातील चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटात भगवान रामाचे महाकाव्य नव्या पद्धतीने दाखवण्यात येणार आहे. आजचा प्रेक्षक आणि नवीन पिढी यांना लक्षात घेऊन हा चित्रपट बनवण्यात आला आहे.
अशातच आज 16 मे रोजी अभिनेता प्रभासने ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत आहे.
काय आहे पोस्टर मध्ये?
‘आदिपुरुष’ च्या या नवीन पोस्टरमध्ये प्रभास प्रभू श्रीरामाच्या तर देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेमध्ये दिसत आहे. पोस्टरमध्ये श्रीराम आपले परम भक्त हनुमानाच्या पाठीवर धनुष्यबाण चालवत आहेत.तसेच या पोस्टरमध्ये जबरदस्त ग्राफिक्सचा वापर करण्यात आला असून हे पोस्टर पाच भाषांमध्ये रिलीज करण्यात आले आहे.