मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर जेलिटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळल्यापासून सुरु झालेल्या सचिन वाझे प्रकरणाला रोज नवे वळण मिळत आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता सचिन वाझेनेच आणखी एका पत्रातून स्फोट केला. या प्रकरणी भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला असून अजित पवार यांची चौकशी करण्यात यावी अशी भाजपकडून मागणी करण्यात येत आहे.त्यासाठी भाजपकडून प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
सचिन वाझेने मीडियाला 3 पानांचे पत्र शेअर केले आहे. त्यामध्ये, शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांनीही खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. त्यावरुन आता भाजपा आक्रमक पवित्रा घेत असल्याचे दिसून येते.
भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकत्र येऊन अजित पवार यांनी दोन दिवसांचं सरकार बनवलं होतं. त्यामुळेच, भाजपासोबत अजित पवार यांचे संबंध आजही चांगलेच आहेत, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगतात.
मात्र, सचिन वाझे प्रकरणावरुन आता भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला असून अजित पवार यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे, भाजपाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी करण्यात येणार आहे.