बारामती – १९८९ साली बारामतीतील काही पुढारी मंडळींनी शरद पवार यांची भेट घेतली. अजितला राजकारणात घ्या, असे सांगितले. त्याला राजकारणात घेतो आणि मी काटेवाडीला शेती करायला जातो, अशा शब्दांत शरद पवार यांनी त्या मंडळींना खडसवले होते, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. यावेळी छत्रपती, माळेगाव, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कोणी स्थापन केल्या आहेत. असा टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ कन्हेरी येथील हनुमान मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शहराध्यक्ष जय पाटील यांनी प्रास्ताविक केले. अजित पवार यांनी विरोधी पवार कुटुंबीयांचा खरपूस समाचार घेतला.
यावेळी विजय शिवतारे, मंगलदास बांदल, वासुदेव काळे, प्रदीप गारटकर, चंद्रराव तावरे, बाळासाहेब गावडे, विश्वासराव देवकाते, सतीश काकडे, रंजन तावरे, सचिन सातव, किरण गुजर, नवनाथ पडळकर, ॲड. सुधीर पाटसकर, बाळासाहेब तावरे, केशव जगताप ,पुरुषोत्तम जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
सुळे, श्रीनिवास, रोहित पवार, योगेंद्र यांच्यावर टीकेची झोड
सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर पवार म्हणाले की, दिल्लीत नढायचं नसतं मतदारसंघासाठी लोकहिताची काम करायचे असतात. त्यासाठी लोकांना आपले करायचं असतं. अशी टीका सुळे यांच्यावर केली. श्रीनिवास पवार व अन्य धंदा पाणी करणारी मंडळी आहे. दोन महिने त्यांनी धंदापाणी सोडून माझ्या विरोधात प्रचाराला सुरुवात केली आहे. श्रीनिवास पवार मतदारांशी कशा प्रकारे संवाद साधतात घड्याळाला मत देऊ नका हे सांगतात. युगेंद्र पवार यांचे नाव न घेता काहींना तर आत्ताच आमदारकीचे स्वप्न पडायला लागली, असा टोला त्यांनी लगावला. रोहित पवार यांचा जन्म देखील झाला नव्हता. तेव्हापासून या संस्था वाढवण्याचे काम केले आहे. अशा शब्दांत यांनी सुनावले.
विरोध असताना रोहितला मी तिकीट दिलं
2017 मध्ये राजेंद्र पवार यांनी जिल्हा परिषदेत रोहितला संधी द्यावी, अशी मागणी केली. पवार यांनी मात्र याला विरोध केला. धंदा, पाणी बघा. राजकारणात नको, असे सुनावले. त्यावेळी गुणवडी शिरर्सुफळ गटातून अपक्ष म्हणून लढण्याची त्यांनी तयारी केली. शरद पवार विरोध पत्करून मी रोहितला संधी दिली. त्यानंतर आमदारकीची इच्छा व्यक्त केली. मगरपट्टा माझी सासरवाडी आहे तिथून मी निवडणूक लढतो सांगितले. त्याला देखील विरोध होता. अखेर कर्जत जामखेड येथे आमदारकीसाठी संधी दिली असा खुलासा अजित पवार यांनी यावेळी केला.