मोठ्या घडामोडी घडणार! नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना होणार

मुंबई – काँग्रेसची प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती आल्यापासून काँग्रेस नेते नाना पटोले चांगलेच आक्रमक  झाले आहेत. आगामी काळातील सर्वच निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावरच लढेल, असे नाना पटोले यांनी ठणकावून सांगितल्याने सध्या एकच गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र हे सुरु असतानाच  नानांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आले आहे. त्यामुळे नाना पटोलेंनी  आपला उत्तर महाराष्ट्रात सुरु असलेला दौरा अर्ध्यावर सोडला आहे. तसेच ते उद्या दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र या पुढील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. त्यासाठी काम देखील सुरू आहे. तसेच, विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचाच असेल, येत्या पावसाळी अधिवेशनात त्याची निवड होणे अपेक्षित आहे. मात्र, ही निवड होण्यासाठी सर्व आमदार सभागृहात असणे अपेक्षित असते.

गेल्या अधिवेशनात अनेक आमदार कोविड संसर्गामुळे येऊ शकले नाहीत, असे त्यांनी जळगावमधील दौऱ्यात असताना सांगितले होते. त्यामुळेच, आता विधानसभा अध्यक्षांची निवड आणि आगामी निवडणुकासंदर्भात चर्चा करण्यासाठी नाना पटोले शुक्रवारी दिल्लीसाठी रवाना होणार आहेत, अशी काँग्रेसमधील सुत्रांची माहिती आहे.

नाना पटोले आज धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे दौऱ्यावर आहेत. काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी, तसेच कार्यकर्त्यांमध्ये आगामी निवडणुकांसाठी रणनिती ठरवून उत्साह वाढविण्यासाठी ते दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यात ते सातत्याने स्वबळाचा नारा देताना दिसून येत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत भाजपविरोधी प्रमुख पक्षातील नेत्यांची बैठक घेतली. तसेच, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचीही बैठक त्यांनी घेतली असून निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याही दिल्लीत चर्चा केली. त्यामुळे, देशातील राजकारण तिसऱ्या आघाडीची चर्चा जोर धरु लागली आहे. तर, राज्यातील महाविकास आघाडी सरकारचीही चर्चा दिल्लीच्या राजकारणात रंगत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.