नवी दिल्ली – सीबीआयने २०१९ मधील इंडियन प्रीमियर लीग सामन्यांच्या कथित मॅच फिक्सिंगची दोन प्रकरणे पुराव्याअभावी बंद केली आहेत. क्रिकेट सट्टेबाजीत गुंतलेल्या व्यक्तींचे नेटवर्क पाकिस्तानकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारे सुरू असून त्यातून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यांच्या निकालावर परिणाम होत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर सीबीआयने मे २०२२ मध्ये सात लोकांविरुद्ध दोन एफआयआर दाखल केले होते.
सीबीआयने आपल्या पहिल्या एफआयआरमध्ये दिल्लीतील रोहिणी येथे राहणारे दिलीप कुमार आणि हैदराबादमध्ये राहणारे गुर्राम वासू आणि गुर्राम सतीश यांची नावे दिली आहेत. दुसऱ्या एफआयआरमध्ये सज्जन सिंग, प्रभू लाल मीना, राम अवतार आणि अमित कुमार शर्मा यांची नावे आरोपी म्हणून नोंदवण्यात आली असून ते राजस्थानमधील आहेत.
जवळपास दोन वर्षांच्या तपासानंतरही सीबीआयला त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे सीबीआयने २३ डिसेंबर रोजी एका विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला, ज्यामध्ये त्यांनी प्रकरण बंद करण्याची शिफारस करण्यामागची कारणे सांगण्याबरोबरच या प्रकरणातील आरोप आणि त्याच्या चौकशीचे तपशीलवार वर्णन दिले आहे.
सीबीआयचा हा अहवाल स्वीकारायचा की पुढील तपास सुरू ठेवण्याचा आदेश द्यायचा हे आता न्यायालयावर अवलंबून आहे. मात्र तूर्तास तरी या प्रकरणातील व्यक्तींना दिलासा मिळताना दिसत आहे.