– योगेश मारणे
न्हावरे(प्रतिनिधी) :- आरे बाबांनो आपला शिरूर तालुका ‘रेड झोन’ मध्ये आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. स्वयंशिस्त पाळा. विनाकारण फिरू नका, असे म्हणण्याची वेळ शिरूर तालुक्यातील प्रशासनावर आली आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका रेड झोनमध्ये असल्यामुळे तसेच तालुक्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आणि शासनाने लॉकडाऊनची मर्यादा काही प्रमाणात नियम व अटींवर शिथिल केल्यामुळे जनता स्वयंशिस्तीचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासन व आरोग्य यंत्रणा कमालीची दबावाखाली आहे. पुन्हा एकदा पोलिसांना रस्त्यावर उतरून लॉकडाऊनचे पालन न करणाऱ्यांविरोधात पोलिसी खाक्या दाखवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, अशी परिस्थिती शिरूर तालुक्यात आहे.
तालुक्यात आतापर्यंत 11 करोनाचे रुग्ण सापडले असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर काही उपचार घेत असून, काही रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकंदरीत परिस्थिती पाहता प्रशासन व आरोग्य यंत्रणेने करोना विरोधात चांगला लढा दिला आहे. मात्र, विविध शहरांतून आलेल्या काही उतावीळ नागरिकांमुळे संपूर्ण यंत्रणा व गावाकडची जनता अडचणीत येऊ शकते.अशी परिस्थिती ग्रामीण भागात निर्माण झाली आहे.
त्यासाठी शहरांतून आलेल्या नागरिकांनी करोना बाबत खबरदारी म्हणून स्थानिक प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कारण गावाकडच्या लोकांना करोनाचा धोका गावातल्या लोकांकडून कमी प्रमाणावर असून बाहेरून आलेल्या लोकांपासून अधिक आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शहरांतून आलेल्या लोकांची माहिती पुन्हा अधिक तत्परतेने गोळा करून त्यांना क्वारंटाइन करण्याचे आव्हान स्थानिक प्रशासनापुढे आहे.
शहरांतून आलेल्या नागरिकांशी मानवतेचा व्यवहार गरजेचा ….
विविध शहरांतून व दूर गावांवरून आलेल्या नागरिकांशी स्थानिक गावकऱ्यांनी मानवतेचा व्यवहार ठेवणे गरजेचे आहे. त्यांना गावात घेताना त्यांच्याशी प्रेमाने व आपुलकीने वागले पाहिजे. ते नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी किंवा शहरात गेले होते. ते जेथे परतले ते त्यांचेही गाव आहे. मात्र अशा व्यक्तींनीही स्थानिक प्रशासनाला सहकार्य करायला हवे.