फलटण, (प्रतिनिधी) – फलटण तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाणवू लागली आहे. पशुपालकांनी चारा पिकांची जास्तीत जास्त लागवड करून पशुधनाचे संगोपन करावे आणि दूध उत्पादनातील सातत्य टिकवून ठेवावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे पुणे येथील प्रादेशिक सहआयुक्त डॉ. संतोष पंचपोर यांनी केले.
दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात चारा लागवडीसाठी बियाणांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. पशुपालकांना मका बियाणांच्या वाटपप्रसंगी ते बोलत होते. तालुक्यातील पशुवैद्यकीय संस्थांमार्फत पशुपालकांना बियाणे वाटप होणार आहे. ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे, तेथे बियाणांचे वाटप करून पशुपालकांना चारा पिके घेण्याबाबत प्रोत्साहित करण्याची सूचना पंचपोर यांनी दिली. मूरघास निर्मितीसाठी पशुपालकांनी पुढाकार घेऊन वर्षभरासाठी नियोजन केल्यास, चारा टंचाईवर मात करता येईल. धरणांमधील उपलब्ध पाण्याचा वापर चारा पिकांसाठी करण्यात यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे, सहाय्यक आयुक्त डॉ. पवार, डॉ. भोसले, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. फाळके उपस्थित होते. हा चारा दुष्काळात उपयोगी ठरणार आहे. सध्या तालुक्यात 7 टन मका बियाणे उपलब्ध आहे. लाभार्थी व क्षेत्र यांच्या याद्यांनुसार वाटप केले जाईल. पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी आणि नीरा उजवा कालवा लाभक्षेत्रातील शेतकर्यांना बियाणांचे वाटप केले जात आहे.