विवेकानंद काटमोरे
मांजरी – पुणे-दौंड रेल्वे मार्गावरील मांजरी बुद्रुक रेल्वे गेट क्र.3 येथे उड्डाणपुलाचे तसेच भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात येत आहे. पुढील सूचना येईपर्यंत रेल्वेगेट शुक्रवारपासून (दि.18) अनिश्चित काळासाठी बंद असणार आहे. त्यामुळे मांजरी-केशवनगर- मुंढवा तसेच मांजरी-भापकर मळा-सोलापूर महामार्ग या पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरून 15 नं. ते वाघोली या रस्त्यावरील गोपाळपट्टी येथे रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे काम रेल्वेगेटच्या दोन्ही बाजूने 80 टक्के पूर्ण झाले आहे. यापुढे थेट रेल्वेमार्गावरील काम करण्यात येणार आहे. यासाठी तसेच भुयारी मार्गाच्या कामासाठी सध्या सुरू असलेली रस्ते वाहतूक काम होईपर्यंत बंद करण्यात येणार आहे.
भुयारी मार्गाचे काम रेल्वेकडून करण्यात येणार आहे. तसेच, उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजू जोडणारे मुख्य काम तसेच भुयारी पुलाचे काम झाल्यानंतर लगेचच पादचारी व हलक्या वाहनांसाठी येथील वाहतूक सुरू होईल. तर, उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाल्यानंतर इतर वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी थेट पुलावरूनच वाहतूक सुरू होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हडपसर-मांजरी रेल्वे स्टेशन दरम्यान असलेले रेल्वे फाटक क्र. 3 मांजरी स्टेशनला लागून जे रेल्वे कि.मी. 202/1-2 वर आहे, तेथे उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम सुरू असल्यामुळे हे रेल्वेफाटक तसेच रस्ता 18 जूनपासून पुढील सूचनेपर्यंत बंद असेल.
– मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी,
रेल्वे विभाग पुणे मंडल
येथील उड्डाणपुलाचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. हे काम रेल्वे विभागाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी रेल्वे विभागाने गेट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूंचा उतार आणि सर्व्हिस रोडचे काम सुरू राहणार आहे.
– नानासाहेब परभणे,
शाखा अभियंता, सा. बां. विभाग.