पुणे – “म्युकरमायकोसिस’ आजाराच्या उपचारासाठी “ऍम्फोटेरीसिन बी’ हे इंजेक्शन वापरले जात आहे. त्याचा काळाबाजार करून रुग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्या दोघांना 18 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
रवींद्र माने (45, रा. शिवणे), अनिकेत रसाळ (21, रा. लातूर) यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, या प्रकरणात आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाने फिर्याद दिली आहे. 14 जून रोजी कर्वेनगर परिसरात ही घटना घडली.
सध्या “म्युकरमायकोसिस’वरील “ऍम्फोटेरीसिन बी’ या इंजेक्शनचा तुटवडा आहे. आरोपींनी संगनमत करून या इंजेक्शनची विक्री 20 हजार 500 रुपयांना विक्री केली. तसेच विनाविक्री बिल, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय इंजेक्शनची विक्री करून शासन आणि नागरिकांची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी या इंजेक्शनचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयातून होते.
इंजेक्शन नेमके कोठून उपलब्ध केले? त्यांनी यापूर्वी इंजेक्शनची विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने या इंजेक्शनची कोणा-कोणाला विक्री केली?, गुन्ह्यातील इतर साथीदारांचा शोध, तसेच आणखी कोणी साथीदार आहे का?, त्यांच्याकडे इंजेक्शनचा आणखी साठा आहे का? याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकिलांनी केली.