मुंबई – माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोविड-19 डेड बॉडी बॅग प्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी PMLA कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीकडून किशोरी पेडणेकरसह माजी अतिरिक्त आयुक्तांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोरी पेडणेकरांवर आरोप काय?
मुंबई महापालिकेने करोना काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात येत होता. कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांना नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग 2000 रुपयांऐवजी 6 हजार 800 रुपयांना खरेदी केल्याचे म्हंटले जात आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. कोविड काळात किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापौर होत्या. या कथित घोटाळ्यामध्ये तब्बल 49 लाखांपेक्षा अधिकची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी किशोरी पेडणेकर, नागरी अधिकारी आणि इतरांविरुद्ध 5 ऑगस्ट रोजी नोंदवलेल्या FIRवर आधारित हे प्रकरण आहे. त्यानुसार पेडणेकर आणि इतर वरिष्ठ नागरी अधिकार्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 409 , 420आणि 120B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
किरीट सोमय्या यांचा आरोप
दरम्यान, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 18 जुलै रोजी कोविड महामारीच्या काळात खर्चात अनियमितता झाल्याचा आरोप केला होता. यानंतर याप्रकरणात EOW चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता किशोरी पेडणेकर अडचणीत आल्या आहेत.