मराकेश : मोरोक्कोमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.8 इतकी मोजण्यात आली आहे. दरम्यान, या भूकंपामुळे तब्बल 296 लोकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर 153 लोक जखमी झाले असल्याचे मोरोक्कोच्या गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मराकेश शहरापासून 71 किमी दक्षिण-पश्चिमेस 18.5 किमी खोलीवर होता. स्थानिक वेळेनुसार रात्री 11.11 च्या सुमारास येथे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान शहराबाहेरील जुन्या भागाचे झाले आहे. एवढे नाही तर मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
मोरोक्कोच्या अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित व्हिडिओ आणि फोटो देखील पोस्ट केली आहेत, ज्यामध्ये इमारती कोसळल्यानंतर धुळीचे ढग पाहायला मिळत आहेत. मराकेशमध्ये युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. सोशल मीडियावर अनेक पर्यटकांनी भूकंपानंतर लोक धावताना आणि जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करतानाचे व्हिडिओही पोस्ट केले आहेत.
Extremely pained by the loss of lives due to an earthquake in Morocco. In this tragic hour, my thoughts are with the people of Morocco. Condolences to those who have lost their loved ones. May the injured recover at the earliest. India is ready to offer all possible assistance to…
— Narendra Modi (@narendramodi) September 9, 2023
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यासाठी त्यांनी एक ट्विट करत,”मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दु:ख झाले आहे. या दुःखद क्षणांमध्ये माझ्या प्रार्थना मोरोक्कोच्या लोकांसोबत आहेत. ज्या नागरिकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत. या कठीण काळात मोरोक्कोला शक्य ती सर्व मदत देण्यासाठी भारत तत्पर आहे, “असे म्हटले आहे.