नगर – डिसेंबर 2022 मध्ये सकल हिंदू समाजाच्यावतीने नगर शहरात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात कालीचरण महाराज सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी दोन धर्मांत तेढ निर्माण होणारे वक्तव्य केल्याप्रकरणी तब्बल पाच महिन्यांनी नगरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी स्वत:च फिर्याद दिली आहे. त्यानुसार नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात अभिजीत धनंजय सराफ उर्फ कालीचरण महाराज विरोधात 153 (अ) आणि 507(2) या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवारी रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यातील हवालदार अजय गव्हाणे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकल हिंदू समाजातर्फे 14 डिसेंबर रोजी 2022 रोजी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. लव्ह जिहादवर जनजागृती आणि धर्मांतर कायद्याची प्रमुख मागणी यामध्ये करण्यात आली होती. या मोर्चाला कालिपुत्र कालीचरण महाराज आणि गुजरातमधील काजलदीदी हिंदुस्थानी उपस्थित होते.
मोर्चानंतर झालेल्या सभेत दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य कालीचरण महाराजांनी केल्याचा आरोप झाला होता. सभेत कालीचरण यांनी केलेल्या भाषणावरून वाद निर्माण झाला होता. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही विविध संघटनांनी केली होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. पोलिसांच्या गोपनीय शाखेचे पथकही होते. वक्तव्य तपासून आणि कायदेशीर मार्गदर्शन घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन तेव्हा पोलिसांनी तक्रार करणाऱ्या संघटनांना दिले होते. अखेर पाच महिन्यांनी हा गुन्हा दाखल झाला आहे.