मुंबई – मागील काही दिवसांपासून ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. 16 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भगवान श्रीराम यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन माता सीतेची भूमिका साकारत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटातील संवादापासून ते व्हीएफएक्सपर्यंत अनेकांवर सर्वसामान्यांनी आक्षेप नोंदवला आहे.
‘आदिपुरुष’चं पाहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. टिझर नंतर झालेला वाद ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कमी झाल्याचे पाहायला मिळालं. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘आदिपुरुष’ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. राजकीय नेत्यांपासून तर सिनेरसिकांना सर्वांनीच चित्रपटावर संताप व्यक्त केला आहे. अश्यातच आता कालीचरण महाराजांनी देखील ‘आदिपुरुष’वर बहिष्कार घाला अशी मागणी केली आहे.
कालीचरण महाराज नेमकं काय म्हणाले? वाचा…
‘आदिपुरुष’ या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या घटना हिंदू विरोधी आहेत. तसंच देवाच्या चरित्राचा अपमान करणारे शब्द या मध्ये वापरण्यात आले आहेत. हा संपूर्ण प्रकार निंदनीय आहे. हिंदूंच्या इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे हिंदूंनी या चित्रपटावर बहिष्कार घातला पाहिजे अशी मागणी कालीचरण महाराजांनी केली आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, ‘आदिपुरुष’ हा चित्रपट मी पाहिलेला नाही. जे लोक या चित्रपटाला पाठिंबा देत आहेत ते धर्मविरोधी आहेत. ज्यांना वाईट वाटतं आहे ते धर्मप्रेमी आहेत. जे धर्मप्रेमी आहेत त्यांनी या चित्रपटावर बहिष्कार घातला पाहिजे असंही कालीचरण महाराजांनी म्हटलं आहे.