पुणे – शहरात 12 ते 14 जून दरम्यान “जी 20′ परिषद आणि पालखी सोहळा एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे, महापालिका प्रशासनाची चांगलीच कसरत होणार आहे. या कालावधीत “जी 20’ची इलेक्ट्रॉनिक परिषद होणार असून त्याचे प्रदर्शनही होणार आहे. त्यासाठी 36 देशातील प्रतिनिधी हजेरी लावणार आहे. या वेळी शहरात वाहतूक कोंडी तसेच या प्रतिनिधींच्या मार्गात कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ न देण्याची जबाबदारी पालिकेवर आहे. मात्र, त्याच वेळी शहरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येत असून त्या सोबत जवळपास सात ते आठ लाख वारकरी शहरात येतात. अशा स्थितीत, दोन्ही व्यवस्थापनासाठी पालिकेस मोठी कसरत करावी लागणार आहे.
आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले की, येत्या 12 ते 14 जून दरम्यान पुण्यात जी 20 समूह देशांच्या इलेक्ट्रॉनिक्स गटाची बैठक होणार आहे. तर 19 ते 24 जून दरम्यान शिक्षण विषयक गटाची बैठक होणार आहे. या बैठकांची जागा, स्वरूप, रूपरेषा निश्चित करण्यासाठी केंद्रीय पथक पुण्यात आले होते. या पथकाने तयारीसंदर्भात बैठक घेतली. तसेच, काही संभाव्य ठिकाणांची पाहणीही केली. मात्र, या बैठकीच्या काळात पुण्यात पारंपरिक पालखी सोहळाही असणार आहे. त्यामुळे शहरातील काही रस्ते बंद केले जातात. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीदेखील होऊ शकते, ही बाब केंद्रीय पथकाच्या निदर्शनास आणून दिली आहे, पालखी तसेच पाऊस लक्षात घेऊन नियोजन करावे लागणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.