कवठे -वाई तालुक्याच्या पूर्व भागातील पाचवड व व्याजवाडी येथील प्रत्येकी एक जण मंगळवारी (दि. 9) करोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर याच गावांमधील आणखी प्रत्येकी तीन जणांचे अहवाल बुधवारी (दि. 10) रात्री उशिरा पॉझिटिव्ह आले. त्याचबरोबर वेळे येथेही एक जण करोनाबाधित सापडल्याने तालुक्याच्या पूर्व भागात घबराट पसरली आहे.
वाई तालुक्यातील पाचवड व व्याजवाडी येथे प्रत्येकी एक करोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाने बुधवारीच दोन्ही गावांत खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या होत्या. व्याजवाडी येथील बाधित रुग्णाची पत्नी व कुटुंबातील चार सदस्यांना वाई येथे दाखल करण्यात आले होते. पाचवड येथील बाधित व्यक्ती पुण्यावरून आली होती.
या दोन्ही बाधितांच्या संपर्कात आलेल्या निकटवर्तीयांच्या व अन्य लोकांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. वेळे येथील 59 वर्षांची व्यक्ती काही दिवसापूर्वी गावी आली होती. या व्यक्तीला त्रास होत होता व करोनाची लक्षणे जाणवू लागल्याने मंगळवारी (दि. 9) सातारा येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्याच्या चाचणीचा रिपोर्ट बुधवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. तालुक्यातील या तीन गावांमध्ये एकाच दिवसात सात बाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील करोनाचा संसर्ग आटोक्यात येत असतानाच पूर्व भागात संकट वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे.