सातारा – करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि.12) दुपारी एक वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे सभा होत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने ही सतर्कता घेतली आहे.
जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेनंतर शुक्रवारी दुपारी यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात ही सभा होणार होती. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने सतर्कता दाखवत सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार शुक्रवारी दुपारी ही सभा होणार असून स्थायी समिती सभागृहात अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समितीचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्या दालनात आणि आयटीसेलमध्ये खातेप्रमुखांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. पंचायत समितीच्या कार्यालयांमध्ये त्या त्या तालुक्यातील सदस्य उपस्थित राहणार आहेत. प्रसारमाध्यम प्रतिनिधींची बैठक व्यवस्था सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून कामकाज सुरु आहे. विषय समितीच्या सभा छत्रपती शिवाजी सभागृहात घेण्यात आल्या. सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दिवसेंदिवस जिल्ह्याच्या सर्वच भागात बाधित रुग्ण सापडत असल्याने दक्षता म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यातही अशा सभा घेऊन वेगळा उपक्रम सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. -मनोज जाधव (उपमुख्य कार्यकारी अधिकारी)