नवी दिल्ली – येमेनस्थित हौथी बंडखोरांकडून लाल समुद्रातून जाणाऱ्या मालवाहू जहाजांना लक्ष्य केले जाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे आता या जहाजांनी आपला मार्ग बदलून प्रवास करण्याचे धोरण स्वीकारले आहे.
इस्रायल-हमासच्या युद्धामध्ये पॅलेस्टिनींना पाठिंबा देण्यासाठी हौथींकडून एका पाठोपाठ एक जहाजांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले जाऊ लागले आहेत. त्यामुळे आता सुएझ कालव्यातून होणारी जहाजांची वाहतूक धोकादायक बनू लागली आहे. त्याचा परिणाम म्हणून पूर्वेकडून पश्चिमेकडे केली जाणारी तेलाची वाहतूक देखील धोक्यात आली आहे. ही मालवाहतूक खंडीत झाल्यास त्याचा फटका आफ्रिकेतील गरीब देशांना बसू शकतो.
अलिकडच्या काळात हौथी बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यांमुळे काही मोठ्या जहाज वाहतूक कंपन्यांनी सुएझ कालव्यामार्गे होणारी आपली वाहतूक स्थगित केली आहे. या कंपन्यांमध्ये फ्रान्सची सीएमएसीसीजी, जर्मनीची हपाग लॉएड, डेन्मार्कची मायर्स्क या आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांची जहाजे आता आफ्रिका खंडाला वळसा घालून जाणार आहेत. यामुळे प्रवासाचा कालावधी २ आठवडे आणि प्रवासाचा खर्च किमान तिपटीने वाढणार आहे.