US On Huthi Attack : अमेरिकन सैन्याने लाल समुद्रात स्थित हुथी बंडखोरांनी डागलेल्या डझनहून अधिक ड्रोन आणि अनेक क्षेपणास्त्रे पाडली आहेत. पेंटागॉनने ही माहिती दिली. या हल्ल्यात हुथी जहाजांचे कोणतेही नुकसान झाले नाही किंवा कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. एएफपीच्या वृत्तानुसार, पेंटागॉनच्या सेंट्रल कमांडने सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले की, 10 तासांच्या ऑपरेशनमध्ये 12 ड्रोन, 3 अँटी-शिप बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि दोन पृष्ठभागावरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे पाडण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
गाझाच्या समर्थनार्थ हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील जहाजावर क्षेपणास्त्राने हल्ला केला. यादरम्यान त्यांनी एक निवेदन जारी करून म्हटले की, गाझाच्या समर्थनार्थ व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करण्यासाठी त्यांनी कारवाई सुरू केली आहे. यानंतर त्यांनी भारतातील गुजरातमध्ये येणाऱ्या जहाजासह अनेक व्यावसायिक जहाजांना लक्ष्य केले. ७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या इस्रायल-हमास युद्धानंतर हुथींनी हे हल्ले सुरू केले. हुथी बंडखोरांनी ते गाझा पट्टीमध्ये इस्रायली आक्रमण थांबवण्यासाठी इस्रायल आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या कोणत्याही जहाजाला लक्ष्य करणार असल्याचे म्हटले होते.
याआधी मंगळवारी, युनायटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स (यूकेएमटीओ) ने सांगितले होते की, येमेनच्या पश्चिम किनार्यावरील होडेडा बंदराजवळ स्फोटाचे आवाज ऐकू आले. यावेळी अनेक क्षेपणास्त्रे दिसली.ब्रिटिश सागरी प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी आणखी दोन स्फोट झाले, जे होडेडाजवळ एका जहाजाजवळ झाले.
इजिप्तच्या माध्यमांनी, मंगळवारी इजिप्तच्या सिनाई द्वीपकल्पाच्या किनारपट्टीवरही स्फोट ऐकू आले. इस्रायली लष्कराने सांगितले की, हवाई दलाच्या लढाऊ विमानाने लाल समुद्र परिसरात शत्रूने केलेला हवाई हल्ला हाणून पाडला आहे. हे सर्व हल्ले इस्रायलच्या हद्दीत केले जात होते.
पेंटागॉनच्या म्हणण्यानुसार, हूथी बंडखोरांनी आतापर्यंत एकूण 100 हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत, ज्यात 35 हून अधिक वेगवेगळ्या देशांतील 10 व्यापारी जहाजांना लक्ष्य केले आहे. या हल्ल्यांमुळे व्यापारी सागरी मार्गाला धोका निर्माण झाला आहे, ज्याद्वारे जागतिक व्यापारातील १२ टक्के माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो.