वॉशिंग्टन- अमेरिकेने इंडो-पॅसिफिक सागरी हद्दीत नौदलाच्या तीन विमानवाहू नौका तैनात करून चीन पुढे मोठे आव्हान निर्माण करीत त्यांना थेट शह देण्याचा प्रयत्न चालवला आहे. तीन वर्षांच्या अवधीनंतर प्रथमच अमेरिकेने या भागात आपल्या नौदल सामर्थ्याचे दर्शन घडवले आहे.
या विमानवाहू नौकेबरोबरच नौदलाची क्रुझ जहाजे, विनाशिका, लढाऊ विमाने अशी सामग्रीही अमेरिकेने तेथे तैनात केली आहे. करोनाच्या प्रसारावरून अमेरिका सध्या चीनवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. त्याचवेळी अमेरिकेच्या इशाऱ्यांना भीक न घालता चीनने हॉंगकॉंग वरील आपली पकड अधिक मजबूत केली आहे. दक्षिण चीन समुद्रातील अनेक बेटांवरही चीनने मोठ्या प्रमाणावर लष्करीकरण केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेनेही इंडो-पॅसिफिक भागात आपल्या हालचाली वाढवल्या आहेत.
काही अभ्यासकांनी असे म्हटले आहे की अमेरिकेत करोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे त्यांची लष्करी सिद्धता आता मंदावली आहे असा समज करून घेऊन चीनने भलतेच धाडस करू नये म्हणून अमेरिकेकडून या हालचाली सुरू आहेत. चीनची आर्थिक शक्ती वाढत आहे, तसेच त्यांना आपला लष्करी प्रभावही प्रस्थापित करायचा आहे. त्यांच्या या प्रयत्नांना अटकाव करण्याची सर्व सिद्धता अमेरिकेने चालवली आहे.