हैदराबाद – कॉंग्रेसच्या तेलंगणा शाखेने सोमवारी राजकीय तर्क-वितर्कांना खतपाणी घालणारा ठराव मंजूर केला. त्या ठरावानुसार पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना तेलंगणातून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे साकडे घालण्यात आले. तो प्रस्ताव साेनिया स्वीकारणार का याविषयी उत्सुकता असेल.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारून कॉंग्रेसने तेलंगणाची सत्ता काबीज केली. आता लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर, तेलंगणा कॉंग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीची बैठक झाली. त्यामध्ये मुख्यमंत्री ए.रेवंत रेड्डी, इतर मंत्री, कॉंग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे आणि त्या राज्यातील पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
बैठकीत सोनियांविषयीचा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती नंतर कॉंग्रेसच्या सुत्रांनी दिली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तेलंगणातील मेदक लोकसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले होते.
त्यांच्याप्रमाणेच सोनियांनीही तेलंगणातून निवडणूक लढवावी असे कॉंग्रेसच्या प्रदेश शाखेला वाटते. त्या प्रस्तावाचे पत्र आम्ही सोनिया आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवणार आहोत, असे त्या सुत्रांनी नमूद केले.