दुबई – भारताचा माजी कर्णधार विराट कोहली, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग व अव्वल ऑफ स्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्विन यांनी भविष्यात पंच म्हणून कार्यरत व्हावे, अशी इच्छा ऑस्ट्रेलियाचे माजी आंतरराष्ट्रीय पंच सायमन टॉफेल यांनी व्यक्त केली आहे. या खेळाडूंकडे क्रिकेटचे तसेच सर्व नियमांचे सर्वोत्तम ज्ञान आहे, त्याचा त्यांनी पंच म्हणून उपयोग केला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
टॉफेल यांनी आयसीसीच्या सहकार्याने येथे उदयोन्मुख पंचांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम पंच होण्यासाठी आवश्यक असलेल्या तीन स्तरांवर मान्यता मिळवून देतो. हा अभ्यासक्रम नवख्या पंचांपासून सध्या कार्यरत असलेल्या व्यावसायिक पंचांपर्यंत सर्वांसाठी खुला आहे. भविष्यात पंच म्हणून कोणत्या खेळाडूंना पाहायला आवडेल, असा प्रश्न त्यांना एका माध्यमाने विचारला होता. त्यावर मॉर्नी मॉर्केल, सेहवाग, कोहली व अश्विन यांची नावे त्यांनी घेतली.
पंचाची जबाबदारी सांभाळणे प्रत्येक क्रिकेटपटूला शक्य नसते. मात्र, सेहवाग, कोहली व अश्विन यांच्याकडे क्रिकेटचे परिपूर्ण ज्ञान आहे व त्याचमुळे त्यांना पंचगिरी करताना पाहायला आवडेल, असेही टॉफेल म्हणाले. टॉफेल यांनी 13 पेक्षा जास्त वर्षे आंतरराष्ट्रीय पंच म्हणून काम केले. यादरम्यान आयसीसीने त्यांचा सर्वोत्तम पंच म्हणूनही सन्मान केला होता.
अवघ्या 40 व्या वर्षीच त्यांनी पंच म्हणून निवृत्तीही घेतली. डीकी बर्ड व डेव्हिड शेफर्ड यांच्यासह टॉफेल यांनाही महान पंचांच्या पंक्तीत स्थान दिले जाते. त्यांनी 2004 ते 2008 या कालावधीत सलग पाच वर्षे आयसीसीचे पुरस्कार पटकावले आहेत.