योगराज सिंग यांनी केला पुन्हा आरोप
चंदीगड – सिक्सर किंग युवराज सिंग याचे वडील व माजी कसोटीपटू योगराज सिंग यांनी पुन्हा एकदा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला टीकेचे लक्ष्य केले आहे. फरक इतकाच की यावेळी त्यांनी धोनीबरोबरच कर्णधार विराट कोहली याच्यावरही तोफ डागली आहे. याच दोघांनी आपल्या मुलाचा विश्वासघात केला व त्यामुळेच त्याची कारकीर्द संपली, अशा शब्दात योगराज यांनी या दोघांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
जेव्हापासून युवराजची कामगिरी खालावली तेव्हापासून योगराज यांनी सातत्याने धोनीवर टीका केली आहे. आपल्या मुलावर जो अन्याय झाला तो केवळ धोनीमुळेच झाला, असेही त्यांनी यापूर्वी अनेकदा सांगितले आहे. मात्र, आजवर त्यांनी कधी कोहलीवर टीका केली नव्हती. यावेळी मात्र त्यांची जीभ घसरली असून या दोघांनीच आपल्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला अशी अत्यंत टोकाची टीका केली आहे.
2011 साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत स्पर्धेचा मानकरी ठरलेला युवराज अचानक नकोसा का होतो याचे मला आश्चर्य वाटते. तत्कालीन निवड समितीत असलेल्या शरणदीप सिंग यांनीही युवराजकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. त्यांना संघात काय घडत आहे हे माहिती असूनही ते गप्प का राहिले. त्यावेळी मी अनेकदा याबाबत मत व्यक्त केले. मात्र, त्याची कोणीही दखल घेतली नाही. संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशीही मी याबाबत बोललो होतो, पण तरीही काही बदल झाला नाही. शरणदीप सिंग निवड समितीच्या सदस्याच्या भूमिकेत असताना युवराजच्या समावेशाबाबत त्याने कायम विरोधच केला. ज्याने किती सामने खेळले त्यालाही माहिती नाही अशा लोकांना निवड समितीत स्थान तरी कसे दिले जाते, असेही मत योगराज यांनी व्यक्त केले.
गेल्या वर्षी जूनमध्ये युवराजने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनी व कोहलीकडून आपल्याला सहकार्य मिळाले नाही. माजी कर्णधार व बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मला कायम पाठिंबा दिला तसा या दोघांनी कधीच दिला नाही, असे खुद्द युवराजने सांगितले होते. त्याचाच दाखला देत योगराज यांनी आपल्या मुलाला या गोष्टींचा प्रचंड मनस्ताप झाल्याचेही सांगितले.
ज्या खेळाडूने देशाला विश्वकरंडक जिंकून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली त्याला मैदानावर निवृत्ती घेण्याची संधीही निवड समितीने दिली नाही. युवराजने एका हॉटेलच्या हॉलमध्ये पत्रकारांसमोर आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. असा प्रकार खेळाडूबरोबर होऊ नये. खेळाडूला त्याच्या भूतकाळातील कामगिरीचा सन्मान म्हणून मैदानावर प्रत्यक्ष सामना खेळताना निवृत्ती जाहीर करण्याची संधी दिली गेली पाहिजे, असेही योगराज यांनी म्हटले आहे.
धोनीसमोर तेच ताट
माझ्या मुलावर सातत्याने अन्याय करणारा धोनी आज त्याच परिस्थितीतून जात आहे. जैसी करनी वैसी भरनी म्हणतात ते काही खोटे नाही. जे ताट त्याने युवराजसमोर ठेवले तेच ताट आता धोनीसमोर आहे, असेही योगराज यांनी व्यक्त केले.