नांदेड – राज्याचे माजी मंत्री डी. पी. सावंत यांच्या घरामध्ये भरदिवसा दोन बंदूकधारकांनी घुसखोरी करत 50 हजारांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार आज घडला. या गुंडांनी घरातील नोकराला मारहाण केल्याचे समोर आले आहे. मात्र, या सर्व प्रकरणात डी. पी. सावंत हे सुखरूप असल्याचे समजते. डी. पी. सावंत हे कॉंग्रेसचे माजी मंत्री असून ते अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत.
आज दुपारच्या वेळी नांदेड शहरातील शिवाजीनगर परिसरातील आणि राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरासमोरील माजी मंत्री डी. पी. सावंत यांच्या घरात दोन बंदूकधारी गुंडांनी घुसखोरी केली. यावेळी सावंत आपल्या घरात विश्रांती घेत होते. आरोपींनी सावंत यांच्या घरात घुसून 50 हजारांची मागणी केली. तसेच त्यांनी घरातील नोकराला मारहाण केली. या प्रकारानंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांना तातडीने सूत्रे हलवत एका आरोपीला अटक केली आहे. अन्य एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहे.
या गुंडांनी त्यांच्याकडे 50 हजाराची मागणी केली. दरम्यान, बंदुक घेऊन किचनमध्ये शिरत या गुंडांनी नोकराला मारहाण केली. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. माजी मंत्री डीपी सावंत यांच्या घरी दोन बंदूकधारी का शिरले, त्यांचा उद्देश काय होता याबद्दल अधिक माहिती समजू शकली नाही.