स्वतःचा मतदारसंघ सांभाळता येत नाही, राज्यात काय दिवे लावणार?

पंकजा मुंडे यांनी पराभवाचे खापर दुसऱ्यावर फोडू नये

पुणे – “आपला पराभव दुसऱ्याच्या माथी मारून, स्वत: कसे सुखरूप बाहेर पडायचे, हे षडयंत्र भाजप नेत्या पंकजा मुंडे या करत आहेत. मेळाव्याच्या माध्यमातून काहीतरी वक्तव्य करत पक्षाला ब्लॅकमेल करून आपल्या पदरात काहीतरी पाडून घ्यायचे ही त्यांची पूर्वीपासूनची प्रथा आहे,’ अशी खरमरीत टीका राज्य सभेतील भाजपचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केले आहे.

परळीतील गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांनी गुरुवारी भूमिका मांडली. त्यावर काकडे यांनी शुक्रवारी भूमिका मांडली. “पंकजा मुंडे यांचे वक्तव्य भाजपच्या सच्च्या कार्यकर्त्यांना दुखावणारे होते. त्यांनी हे वक्तव्य पाच वर्षांपूर्वीच कृतीत आणले असते, तर त्या लाखावर मतांनी निवडून आल्या असत्या. ज्या समाजाचा उल्लेख त्यांनी भाषणात केला, त्या समाजाच्या उद्धाराचा विचार त्यांनी पाच वर्षांपूर्वी करायला हवा होता. पाच वर्षे भाजपची सत्ता होती. त्यामध्ये पंकजा मुंडे यांच्याकडे दोन महत्त्वाची खाती होती. स्वत:चा मतदार संघ तुम्हांला सांभाळता येत नाही तर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र काय फिरणार आणि फिरून दिवे लावणार?’ असा खोचक प्रश्‍नही काकडे यांनी विचारला आहे.

“गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच मी राज्यसभेवर आलो. मुंडे हे स्थानिक स्तरावरील नेत्याला स्वत: मदत करून पुढे नेत असत. आता पंकजा मुंडे यांच्या मतदार संघातून मला फोन आले की, पंकजा मुंडे यांचे दुर्लक्ष होत आहे. त्या समाजाच्या नाराजीचे रुपांतर पराभवात झाले. परंतु तो पराभव त्यांनी नेत्यांच्या माथी फोडला,’ असाही दावा काकडे यांनी यावेळी केला.

मराठवाड्याचा पुळकाही आत्ताच आला का?
आपला मंत्री पडला पाहिजे, ते कोणत्याही मुख्यमंत्र्यांला वाटत नाही. परंतु पंकजा मुंडे मात्र संपूर्ण स्वत:च्या चुका दुसऱ्यावर फोडून मोकळे व्हायचे असा प्रकार करत आहेत. पाण्याचा प्रश्‍न त्यांना सोडवता आला नाही, मराठवाड्याचा पुळकाही आत्ताच का आला, असा प्रश्‍नही काकडे यांनी उपस्थित केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.